प्रयोजन

उन्मेषाला निमित्त नसतं. त्याला आपला अविष्कार दाखवायलाच हवा असतो, गरज फक्त माध्यमाची असते. लोकशाहीत, त्यातही भारतासारख्या बहुजिनसी लोकशाहीत, उन्मेष वेगवेगळ्या मार्गांनी प्रकट होत असतो. गणपती विसर्जन असो किंवा स्टेडियममधली जिंकलेली क्रिकेट मॅच, सामुहिक उन्मेष मिळेल त्या मार्गाने येत असतो. जागतिकीकरणात आणि त्यातही फोरजी फाइव्हजी च्या काळात मोबाईल हा जेंव्हा शरिराचा अविभाज्य भाग झाला आहे त्या काळात समाज माध्यमांतून आणि वेगवेगळ्या प्रणाल्यांमधून ही सळसळ वाहत असते.

भारतीय व्यक्तिमत्त्वामध्ये आणि खास करून पुरुषांमध्ये रमायचं असेल, तर काही गोष्टींचं थोडाफार ज्ञान तुम्हाला असणं हे अनिवार्य असतं. जर भारतातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाशी आपली नाळ तुम्हाला जुळवून घ्यायची असेल तीन गोष्टी माहित असाव्या लागतात. एक राजकारण, दुसरं क्रिकेट आणि तिसरा हिंदी सिनेमा. मग या गोष्टींवर चढता किंवा उतरता क्रमांक कोणताही लागो. ह्या तीन गोष्टी जर तुम्हाला ठाऊक असतील तर तुम्ही पानवाल्यापासून ते एखाद्या कंपनीच्या सीईओपर्यंत कोणाशीही संधान साधू शकता. याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे या गोष्टींमध्ये आपल्याला काही फार मोठं ज्ञान आहे आणि आपल्यापेक्षा कोणालाही जास्त समजत नाही, असा गंड अनेकांच्या मनात असतो. आणि जर एखाद्या माणसाला बोलतं करायचं असेल तर त्याला त्याच्या रस असलेल्या गोष्टींबद्दल बोलतं करावं.

रॅशनल पेरूझल या माध्यमाची भूमिका हीच आहे.

देश एका खूप मोठ्या संक्रमणाच्या काळातून जात आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. १९९१ साली एक आर्थिक संक्रमण सुरु झालं, जे २००० पर्यंत अव्याहत सुरु होतं. २०१४ साली एका राजकीय संक्रमणाचा टप्पा सुरु झाला. देशातला एकमेव राष्ट्रव्यापी, सर्वात मोठा आणि सर्वात जुना पक्ष पालापाचोळ्यासारखा उडून गेला. काही लोकांसाठी चांगली तर काहींसाठी वाईट अशी ही क्रांतीच होती. राजकीय परिप्रेक्ष्यावर देशाची कूस बदलत असल्याचं हे लक्षण होतं. अनेकांना देशामध्ये हिंदुत्वाचा उन्माद आल्याचं भासतं, त्याच वेळी याच मंडळींना या सरकारच्या मागे फक्त ३१ टक्के जनादेश असल्याचं जाणवत असतं. यामध्ये ‘हे सरकार आपलं नाही आणि हा पंतप्रधानही आपला नाही’ ही स्पष्ट भूमिका असते. पूर्वीच्या काँग्रेस सरकारमागे २८ टक्के जनादेश होता हे ही मंडळी सहज लबाडीने लपवत असतात.

माध्यमशक्ती सध्या मोठ्या समस्यांमध्ये अडकली आहे हे अनेकांना समजून चुकलेलं आहे. अनेक प्रस्थापित पत्रकार आता पत्रकार राहिलेले नाहीत. राजकारण्यांनी अनेकांना गोड गोड बोलून आणि वेळीप्रसंगी मदत करून उपकृत करून ठेवलं आहे. राजकारण्यांना पत्रकारांशी मधुर संबंध ठेवावेच लागतात. त्यावरच त्यांच्या लोकप्रियतेचा घरचा नळ सुरु असतो. पण पत्रकारांना रोजी रोटी त्यांचं मीडिया हाऊस देत असतं. तरीही राजकारण्यांच्या खाल्या मिठाला जागायचं काम अनेक पत्रकार इमानेइतबारे करतात. बहुतांश प्रस्थापित मीडिया या लोकांनी व्यापून टाकला आहे.

गेल्या साडे चार वर्षांमध्ये सरकारला विरोध कधीही एकसंध पद्धतीने आणि पद्धतशीरपणे झाला नाही. वेळ पडली तेंव्हा राज्यघटना आणि आपली गोंधळलेली वैचारिक भूमिका (किंवा वैचारिक गोंधळ) यांच्यात निवड करायची वेळ आली तेंव्हा तेंव्हा आपल्या क्षुद्र स्वार्थी भूमिकेसाठी देशाच्या व्यवस्थेलाच सुरुंग लावायचे प्रकार झाले. यात पूर्वी अनेकदा चर्चेला आलेला आणि आताही पुन्हा चर्चेत असलेला मतदान यंत्राचा मुद्दा येतो. थेट निवडणूक आयोगाला गद्दार, फितूर, एका पक्षाचा अंकित असलेला मानून झालं. ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने काही गंभीर आरोपांच्या (केवळ आरोपांच्या) प्रकरणांत यांच्या भूमिकेला प्रतिकूल भूमिका घेतली तेंव्हा सरळ देशाच्या सर्वोच्च न्यायमूर्तींच्या गच्छंतीचा प्रस्तावही आणायचा प्रयत्न झाला. आपल्या जवळच्या पक्षाच्या सरकारनेच तयार केलेली ही व्यवस्था असताना आपल्या मूर्ख भूमिकेमुळे आपणच या यंत्रणांच्या विश्वासार्हतेला सुरुंग लावत आहोत याचेही भान कोणाला राहिले नाही. आपणही याच यंत्रणांसह आपला कारभार केला आहे, पुढेही करू हा विचार मनात आणून तरी हे उद्योग थांबायला हवे होते. पण ते नाही झालं. आपल्या भूमिकेला पाठींबा नाही म्हणून सर्वोच्च न्यायमूर्ती वाईट, निवडणूक आयोग चुकीचा ही सुसाईड बॉम्बर मानसिकता विरोधी पक्षाची कधीही नव्हती.

If you cannot convince the others, then confuse. हाच अजेंडा विरोधकांपैकी अनेकांचा असतो. आणि २४/७ बातम्यांचा ध्यास आणि सोस असलेल्या प्रसारमाध्यमांना चघळायला विविध विषय त्यामुळे मिळत असतात. आरोप करणारा एक चिटोरकं घेऊन आरोप करू शकत नाही, पण त्या हवेतल्या गोळीबाराला प्रमाण मानून माध्यमं अश्या लोकांच्या मागे लागतायत जे त्या आरोपांना मोठमोठ्या फायली आणि कागदपत्रं घेऊन पुराव्यानिशी उत्तरं देण्याचा प्रयत्न करतायत. ज्याने चोरी केलेली असते, ज्याच्याकडे लपवण्यासारखं काही असतं तो कागदपत्र घेऊन तासनतास भाषण नक्कीच करणार नाही. पण जडजंबाळ उत्तरांपेक्षा दिलखेचक चटकदार प्रश्नांमध्ये अनेकांना अधिक रस असतो आणि तसंही बेछूट आरोप करणाऱ्याची शक्ती कुठेही जात नसते.

शासकीय, प्रशासकीय, संसदीय आणि न्यायिक पुरावे आणि दस्तऐवजासकट जास्तीत जास्त अस्सल, प्रमाणित आणि प्रमाणित माहिती आणण्याचा प्रयत्न या पोर्टलच्या माध्यमातून काही उन्मेषी मंडळींनी चालू केला आहे. अधिकाधिक प्रतिसाद देऊन सकारात्मक आणि विधायक टीका टिपण्या करून या प्रयत्नांना जास्तीत जास्त पुढे नेणं हे आता वाचकांच्या हातात आहे.

लेखांच्या अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा : फेसबुक / ट्विटर