prasanna joshi abp majha sawarkar nayak ki khalnayak apology

लेखिका : राधिका अघोर

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी अत्यंत फालतू कार्यक्रम करणाऱ्या एबीपी माझा ह्या वृत्तवहिनीने अखेर निवेदन जारी करत क्षमा मागितली आहे. सर्वसामान्य सावरकर प्रेमी जनतेचा हा विजय तर आहेच, पण त्याशिवाय प्रसारमाध्यमांना मिळालेला मोठा धडाही आहे.

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक लोकसत्ताने मदर तेरेसा यांना संतपद मिळाल्यानंतर ‘असंतांचे संत’ हा अग्रलेख लिहून मदर तेरेसा यांच्यावर जहरी टीका केली होती. नंतर लोकसत्ताला दिलगिरी मागून हा अग्रलेख मागे घ्यावा लागला होता. एकेकाळी सत्याच्या बाजूने उभे राहण्यासाठी प्रसिध्द असलेल्या आणि Journalism of Courage हे बिरुद मिरवणाऱ्या एक्स्प्रेस ग्रुपवर ही लाजिरवाणी वेळ आली होती. हा अग्रलेख आणि त्यातील भाषा आक्षेपार्ह निश्चितच होती, मात्र त्याबद्दल जनतेतून फारशा काही प्रतिक्रिया आल्या नाहीत किंवा त्या येण्यापूर्वीच कुठल्यातरी ‘अज्ञात’ दबावामुळे हा अग्रलेख मागे घेत संपादकांना सपशेल शरणागती पत्करावी लागली होती. आजतागायत ह्या निर्भिड वृत्तपत्राने ह्या ‘अग्रलेख वापसी’ मागचे कारण स्पष्ट केलेलं नाही. उलट त्यानंतर अधिकाधिक चुका, अगदी factual चुका करणं सुरु ठेवलं आहे.

अलिकडेच, सरसंघचालकांविषयी खोटी माहिती लिहिली म्हणून त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेत प्रेस कौन्सिलने त्यांना फटकारले आहे, कारवाईची करण्याचे निर्देशही दिले आहेत. सोमेश कोलगे आणि अक्षय फाटक यांच्यासारखी सर्वसामान्य कुटुंबातली मुले चिकाटीने हा लढा लढत आहेत, त्यात त्यांना यशही येईलच.

मात्र, ‘अग्रलेख वापसी’ प्रकरणी सर्व स्वाभिमान खुंटीला टांगणाऱ्या आणि त्याविषयी जराही खंत न बाळगणाऱ्या ह्या संपादक महोदयांचा एबीपी माझा वर कायमच विचारवंत म्हणून सन्मान केला जातो(चोर चोर मौसेरे भाई) त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन, ह्या वहिनीने सावरकरांच्या संदर्भात आचरटपणा करण्याची हिंमत केली असावी. पण उद्दामपणाच्या नादात त्यांनी घोड़चूक केली. सर्वसामान्य माणसाच्या श्रद्धास्थानाला हात घातला. ‘खलनायक’ शब्दाचा अर्थ काय हे खांडेकर, जोशी आणि वागळे अशा सगळ्यांना व्यवस्थित माहिती आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर जे जे आरोप झाले ते अनेक अभ्यासकांनी सप्रमाण, पुराव्यानिशी वारंवार खोडून काढलेले आहेत. न्यायालयाने स्वच्छ शब्दात त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. प्रचंड ‘अभ्यास’ असलेल्या संपादकांना हेही नीटच माहिती आहे. तरीही, सावरकरांच्या मागे ‘खलनायक’ हे विशेषण लावून चर्चेचा फार्स घडवून आणण्याचा गलिच्छ आचरटपणा केला. ही अनावधानाने केलेली चूक नव्हती, तर हेतुपुरस्सर केलेली लबाडी होती.

मी तर एबीपी माझा बघत नाहीच, त्यात असल्या बाष्कळ चर्चा तर अजिबात नाही. मात्र दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावरुन जेव्हा सावरकरांच्या मागे ‘खलनायक’ विशेषण जोडल्याचं कळलं, तेव्हा आधी डोळ्यात पाणी आलं.

एक तेजस्वी माणूस अखेरच्या श्वासापर्यत केवळ ह्या देशाचाच विचार करतो, देशासाठी, समाजासाठी सगळं आयुष्यभर झटतो, त्याची (चिकित्सा करण्याच्या नावाखाली) अवहेलना करण्याची हिंमत अशा पालापाचोळ्या सारख्या माणसांनी करावी? कसा समाज झालाय आपला? निबर ? सत्वहीन…तेव्हा ठरवलं, आपला मध्यमवर्गीय बोटचेपेपणा बाजूला ठेवून या लढ्यात उतरायलाच हवं. मला खात्री आहे, माझ्यासारखीच अनेकांची भावना होती. सर्वसामान्य जनतेने यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. सनदशीर मार्गांनी निषेध नोंदवले.

त्या दबावामुळे एबीपी माझा ने दुसऱ्या दिवशी आणखी एक कार्यक्रम केला.

सावरकरांवर प्रेम करणारे सगळे आदरणीय वक्ते ह्या कार्यक्रमातही गेले, सावरकरांची बाजू मांडायला गेले. सर्वसामान्य जनता आशेने तो कार्यक्रम बघत होती. मात्र त्याही वेळी केवळ शब्दच्छल करुन निवेदकांनी ‘कसं गुंडाळलं यांना’ अशी विजयी मुद्रा करत कार्यक्रम संपवला.

तिथेच, तुम्ही संपलात एबीपी माझा! तुमचा हेतू शुद्ध नव्हता, हे तुम्हीच सिद्ध केले.

सज्जनांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये, सभ्यतेचा सन्मान करावा, त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नये, ह्याचा तुमच्या अहंकारी निवेदकांना विसर पडला. तुमच्या अहंकाराने ‘सज्जनशक्ती’ जागृत केली ! त्याचा परिणाम काय झाला हे तुम्हाला माहिती आहेच !!

लोकसत्ताची अग्रलेख वापसी आणि हा माफीनामा ह्यात हाच मोठा फरक आहे. लोकसत्तावर दबाव आणणाऱ्या ‘शक्तिशाली’ लोकांना आपली ओळख लपवावी लागते. चोरुन दबाव आणावा लागतो. हा दबाव कोणी आणला, हे उघडपणे सांगण्याचे किंवा त्या दबावाला बळी न पडण्याचे धैर्य संपादकांनाही नसते. पण एबीपी माझा प्रकरणात याच्या अगदी विरुद्ध घडलं आहे.

सर्वसामान्य माणसाचा स्वाभिमान जागा झाला, तर मात्र तो कोणालाही घाबरत नाही. ह्या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या प्रत्येकाने आपले नाव लिहून एबीपी माझा ला मेल पाठवल्या, फोनवर निषेध नोंदवले, विरोधाचे मेसेज केले. सावरकरप्रेमी तुमच्या कार्यालयात आले, चर्चा केली, निवेदन दिले. तुमच्या वाहिनीवर बहिष्कार टाकला. जनभावनेचा आदर करत तुम्हाला जाहिराती देणाऱ्या कंपन्यांनी देखील जाहीरपणे निषेध नोंदवत आपला निर्णय सांगितला. कोणीही लपवाछपवी केली नाही. तुम्हाला विरोध करणारी, जनता ‘चेहरा नसलेली झुंडशक्ती’ नव्हती तर सावरकरांचे ऋण मानणारी सर्वसामान्य व्यक्ती होती! त्यामुळेच ह्या सज्जनशक्ती च्या एकवटलेल्या रेट्यापुढे तुम्हाला झुकावंच लागलं.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने उठसूठ गळे काढत स्वयंघोषित आणिबाणी चे स्तोम माजवणाऱ्या ढोंगी मीडियाला मिळालेले हे दोन धडे आहेत. ‘खलनायक’ शब्दासोबतच, ‘स्वातंत्र्याची गळचेपी’ आणि ‘स्वातंत्र्याचा गैरवापर’ ह्या शब्दांचे अर्थही नीट समजून घ्या आता जोशी!

हा लढा लढणाऱ्या मंजिरीताई, रणजित सावरकर, शेषराव मोरे सर, धर्माधिकारी सर, शेवडे गुरुजी आणि असंख्य सावरकरप्रेमी एरवी कोणाच्या अध्यात मध्यात न जाता आपलं काम सकारात्मकतेने करणारी मंडळी आहेत. सावरकरांचं कार्य जगापुढे आणताना त्यांनी इतरांची बदनामी करण्याचं काम कधी केलं नाही. मात्र, अशा सज्जन लोकांना ह्या वहिनीने हाती शस्त्र घ्यायला लावलं.

एवढा उद्दामपणा करतांना, सद्सद्विवेकबुद्धी एकदाही आठवली नाही? देशासाठी आयुष्य देणाऱ्या सावरकरांच्या बाबतीत इतकी खालची पातळी गाठताना, एकदाही तुमच्या मनाने तुम्हाला हाक दिली नाही? एकदाही लाज वाटली नाही का हो? आजही तुम्ही मनापासून क्षमा मागितलेली नाही, हे आम्हाला नीट माहिती आहे. त्याची ना सावरकरांना गरज आहे ना त्यांच्या अनुयायांना! सावरकरांनी जिवंतपणे आणि गेल्यानंतरही खूप अवहेलना सोसली आहे, टीका झेलली आहे. त्यामुळे ना ते संपले, ना संपतील. उलट सोन्यासारखे आणखी उजळून निघतील! मात्र, ह्या पत्रकारांनी स्वतःच्या व्यवसायाशी आणि मनाशी जो व्यभिचार केला आहे, त्यातून ते आपल्या आत्म्याचा सामना कसा करु शकतील? आपल्या मुलाबाळांच्या नजरेला नजर देऊ शकतील? आत्मा मेलेली व्यक्ती एकतर मुखवटा लावून बनेल म्हणून जगासमोर वावरत असते किंवा मग कणाहीन निर्जीव प्रेतासारखं आयुष्य जगत असते… तुम्ही कोण आहात?

कधीतरी उघडा डोळे, करा जरा नीट विचार – आणि विचारा स्वतःला !!

लेखांच्या अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा : फेसबुक / ट्विटर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here