अश्विन अघोर

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा प्रचंड बहुमताने निवडून काय आले डावे-पुरोगामी आणि ल्युटीयन पत्रकारांचा सूर पार बदलून गेला. कालपर्यंत मोदी सरकारवर टीका करताना तोंडात तीळ भिजत नव्हता. आणि आज मोदींची तारीफ करताना हे थकत नाहीत.

२०१४ पर्यंत ल्युटीयन दिल्लीत बसून देशाची सूत्रे हलविणारे आज अक्षरशः हतबल झाले आहेत. गेल्या पाच वर्षात त्यांना मिळत असलेल्या सोयी आणि इतर सरकारी मदत पूर्णपणे बंद झाली. नरेंद्र मोदी जर सत्तेत आले तर असं काहीतरी होईल, याची थोडीफार कल्पना ह्या मंडळींना आली होतीच, पण मोदींनी त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त नाड्या आवळल्या.

२०१४ साली भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर लगेचच ल्युटीयन दिल्लीच्या धुरिणांनी ते उलथविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. कॉंग्रेस काळात खीरापतींची सवय लागलेल्या डाव्या – पुरोगामी पत्रकार संपादकांनी, कलाकार, साहित्यिकांनी भाजपा सरकार विरुध्द रान उठवायला सुरवात केली. दिल्लीच्या उच्चभ्रू भागात फुकटात मिळालेली घरे रिकामी करायला सांगितली, सरकारी खर्चाने सुरु असलेला राजेशाही पाहुणचार बंद झाला आणि लगेच देशात असहिष्णुता आली. गेली पाच वर्ष भाजपा, संघ, मोदी आणि अमित शहांची यथेच्च बदनामी केली गेली. मोदी आणि भाजपा पुन्हा कधीच सत्तेत येऊ शकणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले. एकदा सत्तेत आले, पण पुन्हा कधीच नरेंद्र मोदी सत्तेत न येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली. पण देशाच्या जनतेने मोदींना निवडून, ल्युटीयन पत्रकार आणि विचारवंतांना चपराक लगावली.

दुसऱ्यांदा सत्तेत आल्यावर आपलं भविष्य स्पष्ट दिसू लागल्याने, आता ल्युटीयन पत्रकारांनी रंग बदलायला सुरवात केली आहे. ज्याप्रमाणे गेली पाच वर्षे मोदी सरकार विरोधी आघाडीचे नेतृत्व वरिष्ठ संपादक शेखर गुप्ता करत होते, त्यांनीच आता मोदींची आणि त्यांच्या सरकारची वारेमाप स्तुती करायला सुरवात केली आहे. दिल्लीत आयोजित एका चर्चासत्रात शेखर गुप्ता यांनी चक्क ल्युटीयन पत्रकारांच्या हिडीस मानसिकतेची कबुलीच दिली.

“आम्ही देशभर मोदी सरकार विरोधात पुरावे शोधत फिरत होतो. पण आम्हाला एकही पुरावा मिळाला नाही. आम्ही घरात डोकावून बघितलं तर आम्हाला गॅस सिलेंडर दिसायचं, पण मोदी सरकार विरुध्द नाराजी, किंवा क्षोभ कुठेच दिसला नाही. हे सगळं घडत होतं आणि तीच वास्तविकता होती, पण आम्हाला ती बघायची नव्हती,” शेखर गुप्ता म्हणतात.

असा कबुलीजबाब देणारे गुप्ता एकटेच नाहीत. प्रख्यात ल्युटीयन पत्रकार मधु त्रेहान, नलिनी सिंग, सबा नक्वी सर्वांनी एकसुरात ‘ल्युटीयन संस्कृती’ला नावं ठेवायला सुरवात केली आहे.

त्रेहान बाईंनी तर ल्युटीयन पत्रकारांचं गुपितच उघड केलं आहे. आज पत्रकारिता, शिक्षण, ब्युरोक्रसी आणि राजकारणात असलेल्या सर्व प्रभावशाली व्यक्ती एकतर शाळेत एकत्र होते किंवा एकमेकांचे पारिवारिक मित्र तरी आहेत.

त्रेहान यांनी एका टीव्ही कार्यक्रमात नुकताच हा गौप्य स्फोट केला, कि प्रादेशिक भाषा बोलणाऱ्या लोकांचा ल्युटीयन दिल्ली तिरस्कार करते. बाहेरून आलेल्या लोकांना, नेत्यांना दिल्लीत थारा मिळू दिला जात नाही. सगळ्या सरकारी सुविधा, समित्यांवर नियुक्त्या, अनुदाने, पुरस्कार आपल्याच कंपूत फिरवत ठेवणे आणि त्याद्वारे, देशाच्या सत्तेची किल्ली आपल्या हातात ठेवणे हा मुख्य उद्देश. गेली जवळपास सात दशके हा डाव जमून येत होता. पण गेल्या लोकसभा निवडणुकीत ल्युटीयन दिल्लीचा गड ढासळू लागला आणि पुढील पाच वर्षात पार जमीनदोस्त होण्याची दाट शक्यता आहे.

आता अंत दिसू लागल्याने तमाम ल्युटीयन पत्रकारांची पाचावर धारण बसणे साहजिक आहे. त्याच भीतीतून आता उपरती झाल्यासारखे हे लोक आपल्याच कंपूवर टीका करत सुटले आहेत. यातही ल्युटीयन दिल्लीचा खरा चेहरा उघड करणे हा नव्हे तर, खरा उद्देश आहे स्वतःची कातडी वाचवून होता होईल तितकी सरकारी मर्जी राखणे.

मधू त्रेहान, सबा नक्वी यांसारखे पत्रकार आज बोलत आहेत कारण, आपली सद्दी आता संपली आहे हे, त्यांच्या लक्षात आले आहे. आणि आता मोदींच्या चरणाशी लोळण घेण्यावाचून पर्याय नाही.

मधु त्रेहान यांनी ल्युटीयन पत्रकारांचे राज्यकर्त्यांशी असलेले साटेलोटेच उघड केले आहे आणि त्यावर खरपूस टीका केली आहे.

सबा नक्वी तर दोन पावलं पुढे जाऊन म्हणतात कि ल्युटीयन पत्रकार आणि कॉंग्रेस प्रणीत सरकारांच्या चुकीच्या धोरणांमुळे, मुस्लीम समाज देशापासून तुटत गेला, मागास राहिला. मुस्लीम आणि इतर धर्मात एक दरी निर्माण झाली.

आता असा प्रश्न उपस्थित होतो, कि हे आत्ता कसं सुचलं? इतकी वर्ष का नाही बोललात? कारण काल परवा पर्यंत एक अंधुकशी का होईना, अशा होती कि भाजपा सत्ता स्थापन करण्या इतक्या जागा जिंकणार नाही मग, आपल्याला हवा तो पंतप्रधान बसवता येईल. पण लोकसभेच्या निकालांनी सर्वांना तोंडघशी पाडलं आणि सगळे पोपटासारखे बोलायला लागले.

खरं म्हणजे, हे शहाणपण नाही, तर लाळघोटेपणा आहे, जो हे लोक आयुष्यभर करत आले. आता देखील उद्देश एकच आहे, तो म्हणजे काही तरी करून सरकारची मर्जी संपादन करणे आणि आपली दुकानदारी सुरु ठेवणे.

लेखांच्या अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा : फेसबुक / ट्विटर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here