कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे अतिशय बेजबाबदार राजकीय नेते असून आपली राजकीय उद्दीष्ट साध्य करण्यासाठी ते कोणत्याही मर्यादा ओलांडायला तयार आहेत हे आम्ही या आधीच्या एका लेखात उदाहरणासह स्पष्ट केलं होतं. भारतीय राज्यव्यवस्था जुलमी आहे, आणि ती आदिवासी, दलित, वंचित यांची दुश्मन आहे, अशा प्रकारचा अपप्रचार नक्षलवादी आणि इतर देशविघातक शक्ती नेहमीच करत असतात. कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारने आतापर्यंत या आदीवासी वर्गाला काही सुविधा पुरवाव्यात यासाठी फारसे लक्ष दिले नसल्यामुळे त्यांच्या या प्रचाराला बळ मिळत होते.

पण इतकी वर्षे सत्तेत असलेल्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने नक्षलवादी अपप्रचारात वापरतात ती भाषा वापरावी हे देशाचे मोठेच दूर्दैव आहे. राहुल गांधी यांनी निवडणुक प्रचारादरम्यान मध्य प्रदेशातील शब्दोल मध्ये वापरलेली भाषा आणि धादांत खोट्याच्या आधारे केलेला अपप्रचार कोणाही विचारी भारतीयाला संताप आणणारा आहे. मोदींना कॉंग्रेसचा विरोध आहे, हे एकवेळ समजू शकते. पण अशा प्रकारचा अपप्रचार करुन राहुल गांधी यांनी देशाच्या मुळावरच घाव घालायला सुरूवात केली आहे, हे खेदजनक आहे.

या प्रचार सभेतील भाषणात राहुल म्हणतात, मोदी सरकारने आदीवासी कायद्यात असे बदल केले आहेत की, “आदीवासींना थेट गोळ्या घालण्याचे अधिकार सरकारला देण्यात आले आहेत. आदीवासींकडून जमिन आणि नैसर्गिक साधने हीरावून घेण्याचा अमर्याद अधिकार सरकारला मिळाला आहे, या अधिगृहणाला विरोध करणा-यांना थेट गोळ्याच घालण्याची तरतूद केली आहे.”

हे अर्थातच धादांत खोटे वक्तव्य होते.

अशा प्रकारची कोणतीही तरतूद मोदी सरकारने केलेली नाही. राहुल गांधी यांनी केलेला हा निव्वळ कल्पनाविलास होता, यात शंका नाही. आदिवासीच सोडा, कोणत्याही गुन्हेगाराला अशी थेट गोळ्या घालण्याची तरतूद होणे अशक्य आहे.

पण मोदी सरकारला आदीवासी पट्ट्यात बदनाम करण्यासाठी राहुल गांधी यांनी जे कधी झालंच नाही अशा कायद्यातल्या सुधारणांचा उल्लेख केला. आदीवासी समाजाला सरकार विरोधी चिथावण्यासाठी नक्षलवादी अशाच प्रकारे परिघावरच्या लोकांना घाबरवून चिथावत असतात. राहुल गांधी जणू काही नक्षल म्यॅन्युअल मधील उतारा काढून त्याची अंमलबजावणी करत होते. नक्षलवादी अशाच प्रकारे अर्धसत्य, विपर्यस्त, आणि धादांत खोटे सांगून आदिवासींना सरकारी यंत्रणांच्या विरोधात भडकवण्याचे उद्योग करत असतात. तसाच प्रकार मुख्य प्रवाहातल्या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याने करणे हे धक्कादायक आहे.

कॉंग्रेस पक्षाने अशा अतिरेकी शक्तींशी समझोता करण्याचा सपाटा लावला आहे. मुस्लिम कट्टरतावादी पक्ष असलेल्या मुस्लीम लिगशी कॉंग्रेसने केरळमध्ये आघाडी केली आहे. केवळ भाजपला रोखणे या एकमेव ध्येयाने पछाडलेल्या कॉंग्रेसने मुस्लीम मतांच्या भरोशावर वायनाडच्या जागेवर राहुल गांधी यांना उमेदवारी दिली.

कोणत्याही परिस्थितीत मोदींना रोखणे हे एकमेव ध्येय असलेल्या कॉंग्रेस अध्यक्षांनी आतापर्यंत राफेल गैरव्यवहारापासून ते चौकीदार चोर है या घोषणेपर्यंत खोट्या आरोपांची अक्षरश: राळ उडवून दिली आहे. तरीही त्यांना मोदी यांची लोकप्रियता कमी करण्यात यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर केरळात इस्लामिक कट्टरतावादी आणि मध्येप्रदेशात डावे अतिरेकी यांच्याशी नाते सांगण्यापर्यंत कॉंग्रेसची मजल गेली आहे. या घडामोडींकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे आणि त्यातून आजच्या काँग्रेसचे खरे रूप समजून घेतले पाहिजे.

लेखांच्या अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा : फेसबुक / ट्विटर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here