ज्या स्वयंघोषित विचारवंतांना, स्वयंघोषित पुरोगाम्यांना, स्वयंघोषित समाजसेवकांना त्यांच्या दांभिक आणि सोयीस्कर भूमिकांबद्दल, टिकेआड लपवलेल्या द्वेषाबद्दल आणि लोकांचा वर्षानुवर्षं बुद्धिभेद केल्याबद्दल आज आपण मुख्यप्रवाहापासून हटवू पाहात आहोत, आणि त्यांच्याच उतावळ्या मूर्खपणामुळे आपल्याला आपसूक यशही येत आहे, अशा नगांना मुख्यप्रवाहात आपणच अडवून ठेवतोय.

कसं? हे समजण्यासाठी ज्यांना मुख्यप्रवाहातून हटवू पाहतोय त्यांची आधी कार्यपद्धती समजून घेऊ.

एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती अशी, की माध्यमांत वारंवार अवतरून ही मंडळी लोकांवर आपला प्रभाव पाडण्यात खूप आधीपासून आत्ता-आत्तापर्यंत यशस्वी होत होती; आणि अजूनही चित्रपट, वेबमालिका, स्टँड अप अशा इतर काही माध्यमांतनं तरुण पिढीचा काही काळासाठी का होईना, राजकीय नाही तर सांस्कृतिकदृष्ट्या का होईना, पण बुद्धिभेद करण्यात बऱ्यापैकी यशस्वी होत राहतात, याचं कारण हे की हे लोक जनतेला भावणाऱ्या मुद्यांवर भर देतात. हिंदू वाईट, उजवे वाईट हा नेहमी दुय्यम किंवा जोडविषय असतो.

‘कोणी गोमांस खाल्लं/घरी ठेवलं तर जमावानं त्याची हत्या केली’ या प्रसंगावरून गदारोळ उठतो तो ‘लोकशाहीत माणसानं काय खावं याचंही स्वातंत्र्य असू नये का?’ या मुद्द्यावरून. देशातली अनेक माणसं राजकारणाच्या सांस्कृतिक आणि वैचारिक अंगांबाबत अनभिज्ञ असतात, त्यांना बातमीच्या मथळ्यामध्येच ‘हिंदू माजले की असेच वागतात’ असं कथानक पेरलं जातंय हे कोणीतरी दाखवून दिल्याशिवाय समजेलच असं नाही.

‘एका लहान मुलीवर बलात्कार झाला’ हे समजलं कीच एवढं वाईट वाटतं, की ही बातमी प्रत्यक्ष घटना घडून दोन तीन महिने झाल्यानंतर, निवडणुकीचा हंगाम लक्षात ठेवून मुख्यप्रवाहात आणलीये हे चटकन लक्षात येत नाही. या बातमीचा चित्रपटाच्या प्रचाराचं साधन म्हणून वापर होतोय आणि त्यात भर म्हणून ‘हिंदू म्हणवून घ्यायची लाज वाटायला हवी’ असंही कथानक पेरलं जातंय याची अनेकांना चटकन जाणीव होत नाही.

अशासारखेच प्रसंग दुसऱ्या बाजूनेही घडत असतात, जिथे गुन्हा करणारा मुसलमान आणि सोसणारा हिंदू असतो. पण त्यांना या माध्यमांतून स्थान किंवा महत्त्व दिलं जात नाही. तशी अपेक्षा ठेवण्यात काही अर्थ नसतो, हे राजकारणाच्या वैचारिक आणि सांस्कृतिक अंगांबाबत जागरूक असणाऱ्या सर्वांना समजलेलंही असतं. इथवर ठीक आहे. खरी चूक यापुढून सुरु होते.

‘दोन दिवसांपूर्वी मुसलमान मेला म्हणून रडत होते. आता हिंदू मेलाय, त्यासाठी कोणी अश्रू का ढाळत नाही? कुठे गेले पुरस्कार वापसीवाले? कुठे गेले सोम्या गोम्या पंपू झंपू वगैरे?’ अशी तुलना सुरु करणं हा निव्वळ मूर्खपणा आहे. कारण इथेच तुम्ही उघडे पडता. तुम्हाला अमुक एका प्रसंगात मेलेल्या हिंदूची पडलेली नाही, पण त्याचं उदाहरण देऊन (थोडक्यात भांडवल करून) तुम्ही विचारयुद्ध खेळू पाहताय, हे दिसून येतं. आणि हे कळायला माणसानं राजकीयदृष्ट्या फारसं जागरूक असावं लागत नाही.

ज्यांची विश्वासार्हता स्वहस्ते मोडीत निघालीये, आणि जे दिवसेंदिवस आपणहून स्वतःचं महत्त्व कमी होईल अशा उचापत्या करत आहेत, अशांना जिथेतिथे ‘आता बोला की आता का गप्प?’ असं डिवचत बसलात तर तुम्ही शेवटपर्यंत त्यांनाच मुख्यप्रवाहात ठेवाल. आज समाज माध्यमं एवढी शक्तिशाली आणि प्रभावी आहेत की तुम्ही सहज कोणताही मुद्दा स्वतंत्रपणे उचलून धरू शकता. योग्य रीतीने मांडलात तर तो वणव्यासारखा पसरणारच. जर ‘हिंदू जमावानं निष्पाप मुसलमानाला मारलं’ हा मथळा कोणी एका प्रसंगासाठी चालवत असेल तर तशाच समांतर प्रसंगासाठी तुम्ही ‘मुसलमान जमावानं निष्पाप हिंदूला मारलं’ असा मथळा चालवू शकता, आणि त्यावरही जनतेतून तेवढ्याच प्रभावीपणे प्रतिसाद मिळवू शकता. कोणी अडवलंय तुम्हाला?

पण तुमचा मथळा मूळ मुद्द्याला बगल देऊन ‘शांतीप्रिय धर्मातल्या जमावानं मणुवादी मुलीवर बलात्कार केला; पुरोगामी वर्तुळातून मूक जल्लोष’ अशा थाटाचं निर्लज्ज कथानक रचतो आणि तोंडावर आपटतो. दाखवण्यापुरतं तरी का होईना, पण तुम्हाला मरणाऱ्याची अजिबात पर्वा नसून फक्त शत्रुपक्षाची जिरवण्यात रस आहे हे तुम्हीच स्वहस्ते जगासमोर उघड करता. तुमचं आवाहनच गंडतं तर यथोचित प्रतिसाद कसा मिळायचा? कसा होईल देशात गदारोळ? कसे ट्रेंड होणार ‘हॅशटॅग’?

कथानक जनमानसात रुजवायचं असेल तर त्याची दवंडी पिटून, ते बोंबलत सांगून उपयोग नाही. ते शांतपणे, आवाज न करता, सुमडीत आणि टप्प्याटप्प्याने पेरावं लागतं. हे ज्यांना जमतं, ते जेमतेम ३% मतदारांचीही मतं न मिळवता मुख्यप्रवाहात राहतात. आणि ज्यांना हे समजतच नाही, त्यांना हवं असलेलं सरकार अनेकदा निवडून येऊनही ते कधीच मुख्यप्रवाही होत नाहीत.

लेखक : कौस्तुभ पेंढारकर

लेखांच्या अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा : फेसबुक / ट्विटर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here